MumbaiCha Raja 2026 | मुंबईचा राजा २०२६ | बार्ज आणि क्रेनच्या सहाय्याने विसर्जन | Kalpeshraj Kubal
Kalpeshraj Kubal и Mata Prime
0:00 / 0:00
MumbaiCha Raja 2026 | मुंबईचा राजा २०२६ | बार्ज आणि क्रेनच्या सहाय्याने विसर्जन | Kalpeshraj Kubal
46 473 просмотра · 14 часов назад
Kalpeshraj Kubal и Mata Prime
46 473 просмотра · 14 часов назад
मुंबईच्या राजाला सांगा रामराम!
कल्पेशराज कुबल
Kalpeshraj.Kubal@timesofindia.com
क्रेन-बार्जवरून समुद्राच्या गर्भात २२ फुटी ‘मुंबईचा राजा’चे विसर्जन!
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली
अरबी समुद्र : शुक्रवारी रात्री गिरगाव चौपाटीवर इतिहास आणि भावना यांचा संगम अनुभवायला मिळाला. एका बाजूला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ होती, तर दुसऱ्या बाजूला लाखो भाविकांच्या मनात बाप्पाविषयीचा ओलावा. जवळपास तीन टन वजनाची आणि २२ फूट उंचीची ‘मुंबईचा राजा’ची मूर्ती किनाऱ्यावर आली, तेव्हा जणू समोरून धावून येणाऱ्या लाटा जणू ‘मुंबईचा राजा’च्या चरणांना स्पर्श करण्यासाठीच आतुर झाल्या होत्या. चौपाटीवर लाखो भाविकांच्या नजरा खिळल्या असताना, समुद्रात काही अंतरावर तरंगणारा ४०० टनांचा भव्य बार्ज पुढील टप्प्याची वाट पाहत होता. पूर्वनियोजित सरावानुसार मंडळाचे शंभरहून अधिक कार्यकर्ते छातीभर पाण्यात उतरले. रस्स्यांच्या सहाय्याने मानवी शक्तीच्या बळावर मूर्ती हळूहळू समुद्राकडे नेण्यात आली आणि बार्जवरील हायड्रॉलिक क्रेनच्या आवाक्यात आणण्यात आली.
क्रेनचा लोखंडी गळ मूर्तीकडे सरकत असताना चौपाटीवरील प्रत्येक नजरेत उत्सुकता होती. अशा प्रकारे गणेशमूर्तीचे विसर्जन होताना पाहण्याची ही मुंबईकरांची पहिलीच वेळ होती. मूर्तिकार आकाश तिरमल याने यासाठी विशेष लोखंडी चौकट तयार केली होती. आठ स्क्रूंच्या साहाय्याने मूर्ती ट्रॉलीशी जोडण्यात आली होती. अखेर क्रेनने मूर्तीसह ट्रॉली अलगद हवेत उचलली आणि बार्जवर ठेवली. त्या क्षणी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अर्धा गड यशस्वी सर झाला होता. टगबोटीच्या मदतीने बार्ज खोल समुद्राच्या दिशेने निघाला. भोवती पंचवीसहुन अधिक नाविकांच्या बोटी आणि मुंबई पोलिसांच्या चार सुरक्षा बोटींचा ताफा होता.
* पुढच्या साल लवकर आना...
समुद्राच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर पुढील विसर्जनाचा टप्पा सुरु झाला. एकीकडे सहाय्यक खजिनदार संदीप सावंत संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून होता. अध्यक्ष किरण तावडे, सरचिटणीस स्वप्नील परब आणि प्रकल्प आखणीकार अभिषेक म्हात्रे यांच्यासह सर्व पदाधिकारी प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवून होते. मूर्ती समुद्रात सोडण्याचा क्षण जवळ आला तसा अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. कारण, एकीकडे आधुनिक विसर्जन प्रक्रियेचे यश आणि बाप्पाच्या विरहाचे दुःख एकाच वेळी मनात उसळले होते. आनंद, अभिमान आणि विरह यांचा संगम त्या क्षणी दिसत होता. विशेष म्हणजे संपूर्ण प्रक्रियेत क्रेन नियंत्रित करणारा अबू साद हा मुस्लिम चालकही भावुक झाला. आपल्या तुटक मराठीत त्याने उच्चारलेले, 'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या साल लवकर आना...' हे शब्द समुद्राच्या लाटांसह दूरवर घुमले. समुद्रात आशिष कामदार, अली हुसेन या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने ही संपूर्ण प्रक्रिया उत्तमरीत्या पूर्ण झाल्याची माहिती; मंडळाने दिली. मंडळाच्या ९९ व्या वर्षातील ‘मुंबईचा राजा’चा ऐतिहासिक निरोप मुंबईकरांच्या स्मरणात राहील. शुक्रवार, रात्रौ ११ वाजून ११ मिनिटांनी अरबी समुद्रात 'मुंबईचा राजा' विसर्जित झाला.
व्हिडीओ. कल्पेशराज कुबल