महाभारत योगरहस्य भाग १९ - योगिराज मनोहर हरकरे #youtube
Vaidik Vishwa
0:00 / 0:00
महाभारत योगरहस्य भाग १९ - योगिराज मनोहर हरकरे #youtube
84 просмотра · 2 недели назад
Vaidik Vishwa
3,74 тыс. подписчиков
84 просмотра · 2 недели назад
*महाभारत योग रहस्य भाग १९
वीर साधकाचे शरसंधान सदा ब्रह्मातच असते अशा सद्सद्विवेकबुद्धीलाच म्हणजे भगवान श्रीकृष्णाला आपल्या जीवनाचे सर्वस्व मानणाऱ्या उन्नत साधकाला वेदव्यास अर्जुन म्हणतात. अर्जुन अवस्था परिपक्व झाल्यावर साधक आता आत्मबलाने युक्त असा भीम बनतो, पण असल्या बलशाली साधकाचा मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण म्हणजे आत्मबुद्धीच असते. भीम म्हणजे आत्मबलाने युक्त असा विचारशील साधक की जो आपल्या आत्मबलाने दुर्वृत्ती दुर्योधनाचा नाश करून महाभारत संपवितो. भीम पराक्रम करून आपल्यातील हेकट दुर्योधनाचा नाश झाल्यावर मग स्वात्मसुखाच्या हस्तिनापूर (शरीर) राज्यावर आरूढ होऊन त्यातूनही स्वेच्छेने निवृत्त होऊन स्वर्गाला गमन करणाऱ्या श्रेष्ठ साधकवृत्ती अवस्थेला वेदव्यास धर्म असे म्हणतात. चांगल्या वाईट वृत्तींच्या युद्धात असला वीर साधक स्थिर असतो. म्हणून त्याला वेदव्यास युधिष्ठिर असेही म्हणतात.
पांडवांचा असला दिव्य प्रपंच भगवान वेदव्यासांनी आपल्या कुशाग्र बुद्धीने थाटला आहे. व्यवहारात अनासक्त पद्धतीने वागणाऱ्या पंडुचे कुंती आणि माद्रीरूपी वृत्तीराण्यांद्वारे प्राप्त झालेले असे हे पाच पांडव होत. गीतेमध्ये मात्र पांडवांपैकी केवळ अर्जुनालाच प्राधान्य देऊन त्यालाच भगवंतरूप विवेकबुद्धीने अध्यात्मोपदेश केला आहे. जन्मतः अज्ञानांध असणाऱ्या दुर्योधनाचा पिता अंध धृतराष्ट्रापासून सुरुवात करून अर्जुनाच्या आत्मोपदेशात गीतेचा शेवट केला आहे.
गीतेत वापरलेली श्रीकृष्णार्जुनाची नामे
गीतेत अर्जुन व श्रीकृष्णाला भिन्न भिन्न नामे वापरली आहेत. अर्जुनाला परंतप, कौंतेय, भारत, धनंजय, पार्थ, गुडाकेश आदी विशेषनामांनी आणि श्रीकृष्णाला हृषिकेश, माधव, मधुसूदन, जनार्दन आदी विशेषनामांनी गौरविले आहे. या बाबतीत काहींचे असे म्हणणे आहे की व्यासांनी काव्याची शब्दपूर्ती करण्याकरिता असल्या विशेषनामांची गीतेत योजना केली आहे; परंतु गीतेसारख्या अतिशय शास्त्रीय ग्रंथात वेदव्यासांसारख्या परम बुद्धीमान महान योग्यांनी त्या प्रकारे गीता लिहिली असेल असे नसून त्या त्या विशिष्ठ अध्यात्मिक प्रसंगाला अनुरूप अशी अर्जुन व श्रीकृष्णाची नावे वेदव्यासांनी ठेवली आहेत. प्रसंगी उपयोगात आणलेली श्रीकृष्णार्जुनांची नावे त्यांचे त्या साधकरूप अवस्थेला धरून जाणूनबुजून ठेवली आहेत. एखाद्या माणसाला फार फार तर एक दोन नावांनी हाक मारता येईल; परंतु उपयोगात आणलेल्या इतक्या नावांनी श्रीकृष्णार्जुनांना संबोधणे शक्य नाही. महाराष्ट्रात साधारणतः शाळेतील एक नाव तर घरचे व्यवहारातील सोपे असे दुसरे नाव असू शकते; परंतु भारतात इतरत्र महाराष्ट्रासारखी अशी दोन नावे एकाच व्यक्तीला ठेवीत नसतात. परंतु ज्याअर्थी वेदव्यासांनी श्रीकृष्णार्जुनांना इतकी विभिन्न नावे ठेवली आहेत त्याअर्थी त्यात त्यांचा अन्य साधनाहेतू असला पाहिजे हे उघड आहे आणि तो हेतू म्हणजे साधकाच्या त्या अवस्थेला धरून उपयोगात आणलेली ती ती नाम उपाधी होत. असल्या बुद्धीपुरस्सर वापरलेल्या नावांचा त्या त्या श्लोकातील त्या त्या प्रसंगाला धरून खुलासा केला जाईल.
धर्म शब्दाचा आशय
आजकाल धर्म शब्दाचा जो सामान्यतः आशय घेतला जातो तशा प्रकारचा आशय गीतेत मुळीच नाही किंवा कोणत्याही वैदिक वाङ्मयातसुद्धा तसा आशय सापडत नाही. धर्म शब्दाचा आशय आजकाल सांप्रदायिक आचारविचार आणि कल्पनांनी सीमित केला आहे. उदाहरणार्थ मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी इत्यादी. परंतु धर्म शब्दाचा आशय या सांप्रदायिक कल्पनांहून अधिक विशाल आहे. गीता लिहिली गेली त्यावेळेस अशा प्रकारचे कथित धर्मसंप्रदाय मुळीच नव्हते. केवळ ज्ञानमय अशी एकच वैदिक परंपरा होती जी आजसुद्धा अन्य रूपात अखिल मानवजातीसाठी विद्यमान आहे.
धर्म म्हणजे व्यक्तिगत धारणा ! असली व्यक्तिगत धारणा प्रत्येक जीवाची भिन्न असू शकते. प्रत्येक जीवावर त्या जीवाच्या अनंत जन्मजन्मांतरातून होणाऱ्या बऱ्यावाईट संस्कारातून जे संस्कार तो जीवात्मा धारण करतो त्या स्थिर संस्कारांच्या मुशीला त्या पिंडाचा धर्म म्हणजे पिंडधर्म म्हटले जाते. म्हणूनच धर्माची परिभाषा ‘पिंडे पिंडे मतिर्भिन्न:’ अशी केली जाते. या अर्थाने प्रत्येकाचा पिंड विभिन्न राहू शकतो; परंतु मानव म्हटल्यानंतर त्याचा सामायिक संस्कारपिंड पुष्कळशा बाबतीत सारखा राहू शकतो जसे आहार, सवयी, विचारपद्धती, भाषा, सामाजिक समज इत्यादी. असल्या सामान्य सामाजिक गृहीत संस्कारांना धर्म मानले जाऊ शकते. धर्माचा वरील आशय गीतेला अभिप्रेत असला पाहिजे. धर्म या शब्दाच्या अनेक परिभाषा शास्त्रामधून दिल्या आहेत. भगवान वेदव्यासांनी दिलेली धर्माची परिभाषा अशी आहे.
“धारणात् धर्ममित्याहू: धर्मो धारयते प्रजाः”
ही धर्माची परिभाषा समजण्यासाठी आजच्या पदार्थविज्ञान (Physics), संभवनशास्त्र (Science of probabilities) या शास्त्रांचा आधार द्यावा लागेल. उत्क्रांती शास्त्राचा सुद्धा त्यासाठी आधार घ्यावा लागेल. हे सारे विश्व ज्या मूलतत्त्वावर आणि मूल अवस्थेवर आधारित आहे त्यास मूल प्रकृती असे म्हणतात. त्या मूलतत्त्वापासून वेगळे एक शून्य, परंतु सर्व संभाव्य अशी अवस्थारहित अवस्था आहे. तिलाच परम ईश्वर अवस्था किंवा परमेश्वर अवस्था असे म्हणतात. ईश म्हणजे नियंत्रण करणे, सर्वव्याप्त राहणे या ईश किंवा सर्वव्याप्त अवस्थेहून वेगळी अशी एक शून्य अवस्था आहे. त्याला परमेश्वर असे म्हणतात.
लेखक – योगिराज मनोहर हरकरे